मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी (Mumabi Cruise Drug Bust Case) प्रकरणानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि एनसीबीचे Zoanal Director समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता नवाव मलिक यांनी नवा दावा केला आहे. आपल्याला धमकीचा फोन आल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली असून फोन राजस्थानमधून आल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोन करणाऱ्या व्यक्तीने समीर वानखेडे चांगलं काम करत असून त्यांच्या कामात अडथळा आणून नका अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. जेव्हापासून आपण नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोविरुद्ध आवाज उठवला आहे, तेव्हापासून मला देशभरातून धमकीचे फोन येत आहेत, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकारने माझी सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. 


गेल्या काही दिवसात नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये असताना समीर वानखेडे यांच्या कुटुंबातील लोकही तिथे होते असा आरोप करत नवाब मलिक यांनी काही फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले होते. तसंच वर्षभरात तुझी नोकरी जाईल, तुला तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही असं आव्हानही नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना दिलं होतं. 


एनसीबीची कारवाई बोगस


मुंबईतील क्रूझवर एनसीबीने केलेली कारवाई बोगस असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं, तसंच त्यांनी तसे पुरावेही सादर केले होते. क्रुझवर एनसीबीचा छापा भाजपच्या सांगण्यावरून केल्याचा आरोपही त्यांनी केला होता.


एनसीबीच्या कारवाई दरम्यान, भाजप नेता मनीष भानुशाली हा आर्यन खान आणि इतर आरोपींना एनसीबी कार्यालयात नेताना दिसला होता. याशिवाय केपी गोसावी नावाचा एक माणूस एनसीबीने ताब्यात घेतलेल्या आरोपींना कार्यालयात आणताना दिसला. एनसीबीने हे दोघंही साक्षीदार असल्याचं म्हटलं होतं. या दोघांवर नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले होते, आणि तेव्हापासूनच नवाब मलिक आणि एनसीबीत वादाची ठिणगी पडली.


हर्बल तंबाखू सापडला होता


नवाब मलिक म्हणाले की, नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोला तंबाखू आणि ड्रग्स मधील फरक समजत नाही. माझ्या जावयाकडून कोणताही गांजा मिळाला नाही. तो हर्बल तंबाखू असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता. माझ्या जावयाला खोट्या आरोपत फसवण्यात आल्याचंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.