राष्ट्रवादीला दे धक्का, माजी खासदार शिवसेनेत दाखल
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय पक्षांत नाराजी उघड उघड दिसून येत आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय पक्षांत नाराजी उघड उघड दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसमधील मुंबईतील नेत्यांने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी खासदार संजय दिना पाटील यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेतले. तसेच खांद्यावर भगवा झेंडा घेत सेनेत दाखल झालेत.
संजय दिना पाटील यांच्या प्रवेशाच्यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांची उपस्थिती होती. संजय दिना पाटील हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची अगोदरपासूनच राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. ईशान्य मुंबई मतदारसंघातून २००९ च्या लोकसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजयी होत लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. लोकसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगता उतरले होते. मात्र, त्यांचा भाजपच्या मनोज कोटक यांच्याकडून पराभवाचा सामना पत्करावा लागला होता.
संजय दिना पाटील यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढण्यास मदत झाली आहे. मानखुर्द -शिवाजीनगर मतदारसंघात त्यांचा प्रभाव असल्याने विधानसभा निवडणुकीत याचा शिवसेनेला फायदाच होईल, असे दिसून येत आहे. या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार असल्याचे या प्रवेशाचा फायदा होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे येथील निवडणूक सोपी जाण्यास मदत होईल.