मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली. पण अजित पवार हे मानायला तयार नाहीत. सुप्रिया सुळे यांनी देखील आपल्या दादाला भावनिक साद घातली. दादा... तुला जे हवे त्यावर आपण चर्चा करु आणि तोडगा काढू. तू पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे आणि परत ये. असं आवाहन त्यांनी केलं होतं. तर दुसरीकडे रोहितनंही आपल्या काकाला फेसबुकवरुन खुलं इमोशनल आवाहन केलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही परत या, परत या. अशी गळ घातली. पण अजितदादा ऐकायला तयार नाहीत. बंडाचा झेंडा फडकवून उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार राष्ट्रवादीत परत यावेत, यासाठी सगळेच शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सोमवारी देखील जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे अशा महाविकासआघाडीच्या नेत्यांनी अजित पवारांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला.


अजित पवार बंड मागे घ्यायला अजिबातच तयार नाहीत. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न फोल ठरलेत. अगदी अजित पवारांना अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद द्यायला शिवसेना तयार असल्याची चर्चाही रंगली. मात्र अशी काही ऑफर नसल्याचं संजय राऊतांनी सांगितलं.


अजित पवारांच्या बंडाला शरद पवारांचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चाही पसरवली जाते आहे. मात्र शरद पवारांनीच त्याचा इन्कार केला आहे.


अजित पवारांनी एवढं पाऊल उचललं आहे तर ते विचार करूनच उचललं असेल असं बबनराव पाचपुते यांनी म्हटलंय. अजित पवारांचे माजी सहकारी आणि सध्या भाजपावासी झालेले बबनराव पाचपुते यांनी अजित पवारांची भेट घेतली. मात्र ही सदिच्छा भेट होती असं सांगत पाचपुतेंनी नेमकी काय चर्चा झाली हे सांगणं टाळलं.