दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : २४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरही राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आलेलं नाही. पण सोमवारपासून सुरु होणाऱ्या आठवड्यात पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठीच्या हालचाली वेगाने होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेसोबत जाण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश नेते सकारात्मक आहेत. या आठवड्यामध्ये बैठकींचा सिलसिला रंगणार आहे. सोमवारी सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात दिल्लीत बैठक होईल. या बैठकीत राज्यात पर्यायी सरकार स्थापन करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल. काँग्रेसनेही शिवसेनेबरोबर जाणं का गरजेचं आहे, हे पवार सोनिया गांधींना पटवून द्यायची शक्यता आहे. तसंच सोनिया गांधीही त्यांचा होकार उद्याच देऊ शकतात.


सोनिया गांधी आणि शरद पवार यांची बैठक झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते पुढच्या भूमिकेबाबत चर्चा करणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आज पुण्यात बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेबरोबर जाण्याबाबत प्रत्येक नेत्याला काय वाटतं हे शरद पवारांनी जाणून घेतलं.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतेक नेत्यांनी शिवसेनेसोबत जाण्यासाठी आग्रही भूमिका मांडल्याची माहिती सूत्रांनी झी २४ तासला दिली आहे. त्यामुळे आता महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करण्याबाबत वेगाने हालचाली होऊ शकतात.