मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखीन एक आमदार भाजपाच्या गळाला लागल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्लेखनीय म्हणजे, या भेटीदरम्यान सध्या भाजपात एन्ट्री करून लागलीच गृहनिर्माण खात्याचं मंत्रीपद मिळवणारे माजी काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील हेदेखील उपस्थित असल्याचं समजतंय. 


वैभव पिचड हे अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावरून वैभव पिचड यांनी शिवसेनेच्या मधुकर तळपाडे आणि भाजपच्या अशोक भांगरे यांचा पराभव केला होता. महायुतीत फूट पडल्यानं मतविभागणी होऊन वैभव पिचड यांना विधानसभेत रस्ता खुला झाल्याचं म्हटलं जात होतं. 


 



भाजपाच्या 'महाजनादेश यात्रे' दरम्यान नगर भागातून प्रवास होताना १७ ऑगस्टच्या आसपास वैभव पिचड यांचा भाजपात अधिकृतरित्या प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.