मुंबई: दिल्लीत भाजपचा अहंकार धुळीस मिळाला आहे. जनतेने द्वेषाचे राजकारण नाकारून विकासाला पसंती दिली. हीच परिस्थिती कायम राहिली तर लवकरच देशभरात भाजपच्या विचारांचं डी-फॉरेस्ट्रेशन होईल, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी वर्तविले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतील आतापर्यंतच्या निकालानुसार आम आदमी पक्ष ६१ जागी तर, भाजप अवघ्या ८ जागी आघाडीवर आहे. त्यामुळे 'आम आदमी पक्ष' (आप) पुन्हा एकदा बहुमत मिळवून सत्तास्थापन करेल, असे चित्र आहे. 



या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी ट्विट करून म्हटले की, दिल्लीच्या निवडणुकीत भाजपने २४० खासदार, ७० मंत्री , ४० स्टार प्रचारक अशा मोठा फौजफाटा मैदानात उतरवला होता. या सगळ्यांनी मिळून तब्बल १००० प्रचारसभा घेतल्या. मात्र, तरीही 'आप'च्या विकास आणि लोकाभिमुख राजकारणासमोर त्यांचा पराभव झाला. लोकांनी द्वेषाचे राजकारण नाकारून विकासाला पसंती दिली, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


दिल्लीत आपची मुसंडी, फळविक्रेत्यांकडून फुकटात संत्री वाटप


तसेच भविष्यात हीच परिस्थिती कायम राहिली आणि  महाराष्ट्राप्रमाणे प्रत्येक ठिकाणी सर्व पक्ष एकत्र आले तर देशभरात भाजपच्या विचारांचे देशभर डी-फॉरेस्ट्रेशन होईल, असेही रोहित पवार यांनी सांगितले. 


दिल्लीत 'आप'ची सरशी, पण भाजपचाही मोठा फायदा


तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही दिल्लीचे निकाल हे मोदी-शहा कॉम्बिनेशनला नाकारणारे असल्याचे सांगितले. देशातील लोकांची मानसिकता बदलली आहे. लोकांनी भाजपला नाकारायला सुरुवात केली आहे. दिल्लीच्या निकालांमुळे यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.