मुंबईकर म्हणत आहेत, `देखो चाँद आया....`
नेहरु तारांगणात चक्क चंद्र अवतरला आहे.
मुंबई : यंदाच्या वर्षी इस्रोकडून राबवण्यात आलेली 'चांद्रयान २' मोहिम ही अवघ्या विश्वाचं आणि अंतराळ जगताचं लक्ष वेधून गेली होती. जवळपास संपूर्ण मोहिम यशस्वी होण्याच्या वाटेवर असतानाच शेवटच्या टप्प्यात तांत्रिक बिघाडामुळे चांद्रयान मोहिम पूर्णत्वास गेली नाही. तरीही यामध्येही या टप्प्यावर पोहोचणाऱ्यासाठी इस्रोवर कौतुकाचा वर्षाव झाला. याचीच दखल घेत मुंबईतील नेहरु तारांगणात एत किमया सर्वाचं लक्ष वेधत आहे.
इस्रोच्या या अद्वितीय मोहिमेला सलाम करण्यासाठी म्हणून वरळी येथील या नेहरु तारांगणामधील पांढऱ्या रंगाच्या घुमटावर चंद्राचा पृष्टभाग साकारण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी उजळून निघणारा हा घुमट पाहता मुंबईच्या या गर्दीत खराखुरा चंद्रच अवतरल्याचं पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर अनेकांनीच या घुमटाचे फोटो शेअर केले आहेत. ज्यावर काही नेटकऱ्यांनी, 'देखो चाँद आया...' अशाही प्रतिक्रिया दिल्या आहेत. साईडवेज, स्टार्ट इंडिया फाऊंडेशन ही स्वयंसेवी संस्था आणि एशियन पेंट्स यांच्या प्रयत्नांतून हा चंद्ररुपी घुमट साकारण्यात आला आहे.
नेहरु तारांगणात साकारण्यात आलेला जवळपास २५.६ मीटरचा व्यास असणारा हा घुमट देशातील सर्वात मोठ्या चंद्राच्या प्रतिकृतींपैकी एक ठरत आहे. ज्या ठिकाणी विक्रम लँडर उतरणार होतं, तोल साउथर्न हेमिस्पेअर या घुमटावर साकारण्यात आला आहे. त्यावर चंद्राच्या पृष्टभागाप्रमाणेत खड्डे, छिद्र असे बारकावेही टीपले गेल्याचं लक्षात येत आहे. येथे तयार करण्यात आलेल्या एका प्रदर्शन गॅलरीतून घुमटाचं अप्रतिम आणि उजळून निघालेली सुरेख झलक अगदी विनामुल्य पाहता येते. या अतिशय आकर्षक अशा चंद्राला पाहण्यासाठी सध्या अनेकांचे पाय नेहरु तारांगणाच्या दिशेने वळत आहेत.