मुंबई : मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. आणि हा ट्विस्ट स्वतःला देशातलं सर्वात कार्यक्षम पोलीस दल म्हणवून घेणा-या मुंबई पोलिसांनीच आणला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भायखळा तुरुंगात मंजुळा शेट्ये ही बाथरुममध्ये पडून जखमी झाली. तिच्या शरीरावर त्यामुळेच जखमा झाल्या होत्या. मंजुळाला मारहाणच झाली नव्हती, अशी अत्यंत धक्कादायक आणि तितकीच बेधडक माहिती, पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे. 


23 जून रोजी मंजुळा शेट्येचा आर्थर रोड तुरुंगात मृत्यू झाला होता. त्यानंतर महिला कैद्यांत मोठा असंतोष उफाळला होता. मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणी भायखळा तुरुंगाची अधीक्षक मनीषा पोखरकरसह बिंदू नाईकवडे, वसीमा शेख, शितल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या तुरुंग पोलिसांना निलंबित करण्यात आलं असून, या सहा जणींवर हत्येचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय. 


गंभीर बाब ही की मंजुळा शेट्येचा मृत्यू मारहाणीमुळेच झाल्याचा शवविच्छेदन अहवाल जे जे रुग्णालयानं दिला आहे. मात्र आता मुंबई पोलिसांच्या या कोलांटउडीमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे या आधीच्या सुनावणीत मंजुळा शेट्टये मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि पोलिसांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते.