अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : भाजपमधील पुढील मेगा भरतीचा मुहुर्त ठरला आहे. सप्टेंबरचा पहिल्या आठवड्यात दोन टप्प्यात ही मेगा भरती होणार आहे. एक सप्टेंबरला महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप हा सोलापुरला होत असून भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष अमित शाह या समारोपाला उपस्थित रहाणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये विरोधी पक्षातील मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यानंतर 5 सप्टेंबरला मुंबईत अशीच एक मोठी मेगाभरती होणार असून यानिमित्तानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधील कोणते मोठे नेते भाजपच्या गळाला लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याआधीच काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेत्यांची भाजपच्या गोटात सामील होण्याची धडपड सुरू आहे. भाजपमध्ये याआधी झालेल्या मेगा भरतीत पिचड पिता-पुत्र, संदीप नाईक, शिवेंद्रराजे भोसले, चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला.


काँग्रेसचे कालिदास कोळंबकर यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वंशज नीता होले यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता. शिवेंद्रराजे भोसलेंसह साताऱ्याच्या ११ नगरसेवकांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता.