CCTV! नालासोपाऱ्यात नायजेरीअन नागरिकांची दहशत, अपहरण करुन एकाची हत्या
मारहाण करतानाची दृश्य CCTV त कैद, नायजेरियन नागरिकांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल
प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई : नालासोपारा (Nalasopara) पूर्वेच्या प्रगती नगर वस्तीत चार ते पाच नायजेरियन (Nigerian) नागरिकांनी घरात घुसून एका नागरिकाला मारहाण केली. त्यानंतर त्याचं अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मायकल कीचेबाबा (वय 50) असं मयत नायजेरियन व्यक्तीचं नाव आहे. 3 मे रोजी आरोपींनी प्रगती नगर इथल्या त्याच्या राहत्या घरी घुसून मारहाण केली होती. त्याला मारत मारत एका गाडीत बसवून त्याचं अपहरण करण्यात आलं. हा सर्व प्रकार रस्त्याकडेला लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला होता.
गुरुवारी मायकेलचा मृतदेह नायगाव परेरा नगर इथल्या एका रूमच्या टॉयलेट मध्ये पोलिसांना आढळून आला. सीसीटीव्ही दृष्यांमध्ये दिसत असलेल्या आरोपींनीच त्याची हत्या केली असल्याची माहिती समोर येत असून अमंली पदार्थांच्या आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
वालीव पोलिसांनी याप्रकरणी पाच ते सहा जणांविरोधात हत्येचा गुन्हा नोंद केला असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.