मुंबई : बुरखाबंदीबाबतचा 'सामना' या मुखपत्रातला अग्रलेख शिवसेनेनं नाकारला आहे. बुरखाबंदीची मागणी करणारा हा अग्रलेख पक्षाला अमान्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पक्षाची भूमिका बैठकीत ठरते, असं शिवसेनेच्या प्रवक्ता नीलम गोऱ्हे यांनी म्हटलंय. बुरखाबंदीबाबतचा अग्रलेख ही वैयक्तिक भूमिका असून शिवसेना पक्ष त्याच्याशी सहमत नसल्याचंही नीलम गोऱ्हेंनी सांगितलंय. त्यामुळे, आता शिवसेनेचा मुखपत्र असलेल्या 'सामना'चा अग्रलेख आणि पक्षाची भूमिका वेगळी कशी काय असू शकते? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्लेखनीय म्हणजे, सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणं गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे जाहीर करुन श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस आणि धैर्याचं दर्शन घडवलं असून रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? असा सवाल उपस्थित १ मे २०१९ रोजी प्रकाशित झालेल्या 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून विचारण्यात आलेला आहे. भारतातही बुरखाबंदी करावी, अशी मागणी शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तून केली गेली. त्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह यांनीही बुरखाबंदी झाली पाहिजे, असं मत व्यक्त केलं. 



हा अग्रलेख प्रकाशित झाल्यानंतर 'शिवसेने'च्या या भूमिकेवर आरपीआय आणि मुस्लिम धर्मगुरूंनी टीका केली. शिवसेनेच्या या मागणीवर एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांनी जोरदार आक्षेप घेतला. महिला कोणतेही कपडे परिधान करू शकतात, मग बुरखा का नाही? असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर आचार संहितेचं उल्लंघन करण्याचा आरोप केला. सोबतच, 'हिंदू महिलांच्या पडदा पद्धतीवरही बंदी आणणार का?' असाही सवाल त्यांनी विचारला.