नीरव मोदीला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा - उद्धव ठाकरे
११४०० कोटींना पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालणाऱ्या नीरव मोदीवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. भाजपकृपेने ते `सुखरुप` सुटले आहेत. दरम्यान, या मोदीला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा, असा टोकदार सल्ला उद्धव यांनी सरकारला दिलाय.
मुंबई : ११४०० कोटींना पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालणाऱ्या नीरव मोदीवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. भाजपकृपेने ते 'सुखरुप' सुटले आहेत. दरम्यान, या मोदीला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा, असा टोकदार सल्ला उद्धव यांनी सरकारला दिलाय.
दरोडेखोर सरकारीकृपेने ‘सुखरूप’
शे-पाचशे रुपये कर्जाचा हप्ता फेडता येत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. त्याच्या घरादारावर जप्तीचा नांगर फिरतो, पण देशातील बनेल उद्योगपतींनी राष्ट्रीयीकृत बँकांची दीड लाख कोटींची लूट केली व ते सगळे दरोडेखोर सरकारीकृपेने ‘सुखरूप’ आहेत. देश सध्या जाहिरातबाजीवर चालला आहे. प्रसिद्धी व जाहिरातबाजीवर हजारो कोटी खर्च सुरू आहे, अशी शब्दात शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' यातून उद्धव टीका केलेय.
देशलुटीच्या कथा आणि दंतकथा रघुरामन राजन यांनी समोर आणल्या तेव्हा त्यांना रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावरून घालवण्यात आले. आता रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर नीरव मोदीलाच बसवा, म्हणजे देशाची अखेरची निरवानिरव करता येईल!, असे सांगत उद्धव यांनी संताप व्यक्त केलाय.
पाहा अग्रलेखात काय म्हटलेय!
भारतात विकासकामांसाठी पैशाची कमतरता नाही; पण बादलीलाच जर छिद्र असेल तर पाणी भरणार कसे, असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेस ११,४४० कोटींचा चुना लावला. चुना लावून हे महाशय सहकुटुंब पळून गेले. नीरव मोदी याने जानेवारीतच देश सोडल्याचे उघड झाले, पण गेल्याच आठवड्य़ात हे महाशय पंतप्रधान मोदींबरोबर ‘दावोस’ येथे मिरवत होते व मोदी यांच्यासोबतची त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत.
नीरव मोदी हा भारतीय जनता पक्षाचा ‘हमसफर’ होता व निवडणुकांसाठी पैसा जमा करण्यात हे महाशय आघाडीवर होते. अर्थात इतका मोठा घोटाळा नीरवने भाजप नेत्यांच्या आशीर्वादाने केला व त्याने बँकांची जी लूट केली त्यातला वाटा भाजपच्या खजिन्यात गेला असा आरोप आम्ही करणार नाही! पण भाजपची श्रीमंती वाढवण्यात व निवडणुका जिंकण्यासाठी वगैरे पैशांचे डोंगर उभे करण्यात असे अनेक नीरव मोदी झटत आहेत. हा पैसा शेवटी राष्ट्राच्या तिजोरीवर डल्ला मारूनच उभा केला जातो हे नीरव मोदी प्रकरणात उघड झाले.
Photo: Reuters
घोटाळ्याची तक्रार तरीही तो परदेशात
'न खाऊंगा न खाने दूंगा' ही पंतप्रधान मोदी यांची घोषणा येथे अपयशी ठरली आहे. पंजाब नॅशनल बँकेत नीरवभाईने घोटाळा केल्याची तक्रार आधीच दाखल झाली होती तरीही हा माणूस दावोसला कसा गेला, दावोस येथे पंतप्रधान मोदी यांना जे उद्योगपती भेटले त्यात तो कसा सहभागी झाला हे आधी सांगा.
भाजपचा 'आधार' मोदीला?
नीरव मोदीचे आधार कार्ड बँक खात्यास ‘लिंक’ केले असते तर काही गोष्टी उघड झाल्या असत्या. सामान्य माणसाला ‘आधार कार्डा’शिवाय स्मशानात लाकडेही मिळत नाहीत व इस्पितळात प्रवेश मिळत नाही, पण नीरव मोदीने ‘आधार कार्डा’शिवाय अकरा हजार कोटींची लूट बँकांतून केली. नीरव सहिसलामत पळून गेल्यावर देशातील तपास यंत्रणा ‘ईडी’ वगैरेंनी त्याच्या मालमत्तांवर धाडी घातल्या. गुरुवारी १८ ठिकाणी धाडी घालून ५१०० कोटी रुपयांचे हिरे व दागिने जप्त केले असे वाचनात आले. अशा मालमत्ता विजय मल्ल्या व ललित मोदीच्यादेखील आहेत, पण तेसुद्धा पसार झाले.
राजकारणी तरुंगात, मल्ल्या-नीरव परदेशात
राजकारणी तुरुंगात जातात. मुंबईत भुजबळ व पाटण्यात लालू यादव तुरुंगात आहेत, पण नीरव मोदीप्रमाणे कृपाशंकर यांचे भाग्य चमकल्याने भाजपकृपेने ते ‘सुखरूप’ सुटले आहेत. पुण्याचे ‘डी.एस.के.’ यांचाही पासपोर्ट जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, पण सरकारच्या नाकासमोरून मल्ल्या व नीरव मोदी पळून गेले आहेत. २०१४ साली निवडणुका जिंकून देण्यात ‘भाजप’च्या मागे जे धनदांडगे उभे राहिले ते काय लायकीचे होते हे आता दिसले.
देश सध्या जाहिरातबाजीवर
देश सध्या जाहिरातबाजीवर चालला आहे. प्रसिद्धी व जाहिरातबाजीवर हजारो कोटी खर्च सुरू आहे. देशलुटीच्या कथा आणि दंतकथा रघुरामन राजन यांनी समोर आणल्या तेव्हा त्यांना रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावरून घालवण्यात आले. आता रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर नीरव मोदीलाच बसवा, म्हणजे देशाची अखेरची निरवानिरव करता येईल, असे उद्धव यांनी सामनाच्या अग्रलेखात म्हटले.