मुंबई, रायगड, रत्नागिरी :  निसर्ग वादळ तीव्र होत असून त्याचा मुंबईसह कोकण किनारपट्टीला धोका आहे. मुंबईपासून समुद्रात ४५० किमी अंतरावर असलेला कमी दाबाचा पट्टा आता मुंबईच्या दिशेने सरकत आहे. या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासनही सज्ज झालं आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या सर्वच भागात संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कुलाबा वेधशाळेचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी झी २४ तासला सांगितले की, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे तो आणखी तीव्र झाला आहे. पुढच्या बारा तासात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल आणि त्यानंतरच्या बारा तासात त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रुपांतर होईल. त्यानंतर या चक्रीवादळाचा प्रवास उत्तरेकडे सुरु होईल. बुधवारी हे चक्रीवादळ किनारपट्टीवर येईल. बुधवारी दुपारनंतर निसर्ग चक्रीवादळ किनाऱ्यावर येईल.


कुलाबा वेधशाळेच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी सांगितले, मुंबईपासून ४५० किमी दूर कमी दाबाचा पट्टा असून तो मुंबईच्या दिशेने सरकत आहे. पुढच्या १२ तासांत त्याचे वादळात रुपांतर होईल. हे वादळ दमण, हरिहरेश्वरच्यामध्ये अलिबागजवळ पार करण्याची शक्यता आहे. त्यावेळी वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किमी किंवा कदाचित १२० किमी इतका असण्याची शक्यता आहे. यावेळी रायगड, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल. तसेच समुद्राच्या लाटा सामान्य लाटांपेक्षा दीड ते दोन मीटर जास्त उंचीच्या असतील. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.



किनारपट्टी भागात मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असे आवाहन केले आहे. तरीही काही मच्छिमार बोटी घेऊन समुद्रात गेले होते. त्यामुळे नौदलाकडून हेलिकॉप्टर टेहळणी करून समुद्रातील मच्छिमारांना किनाऱ्यावर येण्याचे आवाहन करण्यात आले.


मुंबईत कोरोनाच्या संकटाशी लढणारे प्रशासन आता निसर्ग चक्रीवादळाचा सामना करण्यासाठीही तयार झाले आहे. बांद्र्यात एमएमआरडीए मैदानात उभारलेल्या कोविड सेंटरला वादळाचा धोका असल्याने तिथे उपचार घेणाऱ्या कोविड रुग्णांना अन्य ठिकाणी हलवण्यात आले आहे. गोरेगावचे नेस्को सेंटर आणि वरळी स्पोर्ट्स क्लब येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना स्थलांतरित करण्यात आले आहे.



दरम्यान, निसर्ग चक्रीवादळ रायगडात हरिहरेश्वर ऐवजी अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे एनडीआरएफच्या आणखी दोन तुकड्यांना अलिबागला पाचारण करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील पावणे दोन लाख लोकसंख्येला वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. अलिबाग तालुक्यात सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफच्या दोन तुकड्या अलिबाग आणि श्रीवर्धनला तैनात करण्यात आल्या आहेत. तर आणखी दोन तुकड्या अलिबागमध्ये पाचारण करण्यात येत आहेत. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी याबाबत नागरिकांशी संवाद साधला आणि सावध राहण्याच्या सूचनाही केल्या.



निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील चार तालुक्यांतील ६२ गावे प्रभावित होणार आहेत. त्यामुळे कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरु झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही प्रशासन सज्ज झालं आहे. किनारपट्टीच्या गावांमध्ये जाऊन प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज झाले आहे.