मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातली बैठक संपली आहे. वर्षा निवासस्थानावर ही बैठक सुरू होती. या बैठकीमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाबाबत, चक्रीवादळामुळे फटका बसलेल्या लोकांना पुन्हा उभं कसं करायचं? याबाबत चर्चा झाली. सरकारकडून सुरू असलेल्या उपाययोजना आणि मदतीबद्दल मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात बातचित झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी, पुणे आणि इतर जिल्ह्यातील शेतीचं झालेलं नुकसान कसं भरून काढायचं यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. कोकणातील फळबागांना विशेष मदत देऊन या फळबागा पुन्हा उभ्या करण्याबाबतही या बैठकीत बोललं गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


निसर्ग चक्रीवादळाने मोठं नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची मदत म्हणून १०० कोटी रुपये जाहीर केले आहेत. ही सुरुवात आहे. त्याला पॅकेज म्हणू नका, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रायगड जिल्ह्यातील वादळग्रस्त भागाचा दौरा केला.  मुख्यमंत्री ठाकरे यांनी थळ येथे जाऊन नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. मंत्री आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख हेदेखिल त्यांच्याबरोबर होते. पालकमंत्री आदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना रायगडमध्ये वादळाने झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात मागच्या आठवड्यातही दोनवेळा बैठक झाली होती. ही बैठक कोरोनाची परिस्थिती आणि राज्यातला लॉकडाऊन या विषयाबाबत पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मागच्या आठवड्यात दोनदा चर्चा झाली. यातली एक बैठक मातोश्रीवर तर दुसरी बैठक वर्षा निवासस्थानावर झाली होती. मागच्या आठवड्यात शरद पवार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राजभवनावर भेटून मातोश्रीवर गेले होते, त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं.