मुंबई: पुण्यातील पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप केल्यानंतर बेपत्ता झालेल्या मुलीचा अखेर शोध लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नैनितालमध्ये एका ओळखीतील मुलासोबत ही मुलगी सापडली. पोलिसांनी या दोघांना काहीवेळापूर्वीच नवी मुंबईत आणल्याचे समजते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी या अल्पवयीन मुलीने पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. यानंतर ही मुलगी आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता झाली होती. तेव्हापासून या मुलीचा शोध घेतला जात होता. 


दरम्यानच्या काळात या मुलीच्या वडिलांना धमकावण्याचा प्रकार समोर आला होता. निशिकांत मोरे यांच्या अटकपूर्व जामिनाच्या सुनावणीवेळी दिनकर साळवे या पोलीस खात्यातील ड्रायव्हरने मुलीच्या वडिलांना धमकावले होते. हवालदार दिनकर साळवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या पोलीस ताफ्यात होता. त्याने मुलीच्या वडिलांना ‘शांत रहेनेका, मै उध्दव ठाकरे का ड्रायव्हर हूँ’अशी धमकी दिली होती. 


हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले होते. यानंतर गृहखात्याने निशिकांत मोरे आणि दिनकर साळवे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.