VIDEO:उद्धव ठाकरेंच्या कणकवलीतील सभेला भाड्याची गर्दी; नितेश राणेंचा आरोप
कणकवलीतील सभेवेळी उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवर टीकास्त्र सोडले होते.
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गुरुवारी कणकवली येथे झालेल्या सभेत पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केला. नितेश यांनी ट्विटरवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक व्यक्ती शिवसेनेच्या सभेसाठी मुंबईहून ५० गाड्या घेऊन आल्याचे सांगत आहे. उद्धव यांच्या सभेला अशाचप्रकारे मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी येथून गर्दी जमवण्यात आल्याचे नितेश यांनी म्हटले.
कणकवलीतील सभेवेळी उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवर टीकास्त्र सोडले होते. शिवसेनेने काय केले असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. मात्र आम्ही काय केले हे येथील जनतेला ठाऊक आहे. विरोधकांनी जर पुन्हा आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ठेचून काढू. आमच्याकडे आता असे पुरावे आहेत की, आम्ही तुम्हाला पुरून टाकू, असा इशारा उद्धव यांनी दिला होता.
सध्या राज्यभरात विविध पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. उन्हाचा पारा वाढल्यामुळे अनेक ठिकाणी राजकीय पक्षांना फटका बसत आहे. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्ध्यातील सभेकडेही कडक उन्हामुळे लोकांनी पाठ फिरवली होती.