`मुलगा आजोबांच्या पक्षात पण मी वेटिंगमध्ये`
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या नारायण राणेंनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे.
मुंबई : काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या नारायण राणेंनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे. 'महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष' असं नाव राणेंच्या नव्या पक्षाचं असणार आहे.
बहुजन, शेतकरी, कामगार आणि तळागाळातल्या समाजाची भूमिका आम्ही मांडू आणि त्यांच्यासाठी कार्य करू असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे, तसेच देऊ तो शब्द पूर्ण करू असं आपलं ब्रीद वाक्य असणार आहे, असं देखील यावेळी नारायण राणे यांनी सांगितलं.
नारायण राणेंनी पक्षाची स्थापना केल्यावर त्यांचा मुलगा नितेश राणे यांनी हटके ट्विट केलं आहे. मुलगा आजोबांच्या पक्षात पण मी अजूनही वेटिंगमध्ये असं ट्विट नितेश राणेंनी केलं आहे.
नितेश राणे हे अजूनही काँग्रेसचे आमदार आहेत. नारायण राणे ज्यावेळेस सांगतील त्यावेळी काँग्रेस आमदार पदाचा राजीनामा देईन. मी नारायण राणेंचं काम राज्यात करीन. नारायण राणे माझे नेते आहेत, असं वक्तव्यही नितेश राणेंनी केलंय. तसंच शिवसेना ज्यादिवशी सत्ता सोडेल त्यादिवशी मी काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देईन, अशी उपरोधीक टीका नितेश राणे यांनी केली आहे.