`ज्याचा राजा व्यापारी, त्याची जनता भिकारी`; सरकारच्या कामाबद्दल काय म्हणाले गडकरी?
Nitin Gadkari Interview: मुलाखतीत नितीन गडकरींनी विविध विषयांवर आपली सविस्तर आणि स्पष्ट भूमिका मांडली. तसेच देशात होत असलेल्या विकासावरही भाष्य केले.
Nitin Gadkari Interview: ज्याचा राजा व्यापारी, त्याची जनता भिकारी, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. यावेळी त्यांच्या सरकारच्या कामावर भाष्य केले आहे. पार्ले येथे लोकमान्य सेवा संघातर्फे घेण्यात आलेल्या लोकमान्य गप्पा या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी नितीन गडकरींची मुलाखत घेतली. या मुलाखतीत नितीन गडकरींनी विविध विषयांवर आपली सविस्तर आणि स्पष्ट भूमिका मांडली. तसेच देशात होत असलेल्या विकासावरही भाष्य केले.
केंद्रीय रस्ते, वाहतूक विभागात मी सर्व बाबतीत पब्लिक-प्रायव्हेट गुंतवणुकीला प्रोतासहन दिलं. आधी सरकारनेचं सगळं करायचं होतं. पण मी नेहमी म्हणतो, ज्याचा राजा व्यापारी, त्याची जनता भिकारी. सरकार म्हणजे विषकन्या आहे. कोणत्याही पक्षाचं सरकार असू देत. ज्या कामाला हात लावतात, ९९ टक्के कामं, अगदी सोन्याच्या खाणीही तोट्यात आणतात. पण पब्लिक-प्रायव्हेट व्यवस्थेनं विकासाचा दर वाढतो, नफा वाढतो, रोजगार निर्माण होतो, गरिबी कमी होते, असे विधान नितीन गडकरींनी केले.
आज दुर्दैवाने ना उजवे, ना डावे अशी स्थिती आहे. 'आपण संधीसाधू' हेच राजकारणातलं सूत्र असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी गटबदलू राजकारण्यांवर टीका केली. कोण कुठल्या पक्षात कधी घुसतात?, कधी बाहेर जातात?, कुठे जातात? हे कोणालाच सांगता येत नाही. देशात विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता ही सगळ्याच क्षेत्रातली समस्या असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले.
मुंबई-गोवा महामार्ग 6 महिन्यात
'मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर नितीन गडकरी यांनी भाष्य केले आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या अर्धवच राहिलेल्या कामाची सल मला नेहमीच असल्याचे ते म्हणाले. सन 2009 मध्ये याचे काम दोन कंपन्यांना देण्यात आले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम घेतले आणि त्यानंतर विलंब होतच गेल्याचे स्पष्टीकरण गडकरींनी दिले..
मुंबई-गोवा महामार्गावर जमीन अधिग्रहणाची मोठी समस्या आहे. त्यामुळे या कामाला उशीर होत गेला. पण आता बऱ्यापैकी समस्या सुटल्या असून पुढील 6 महिन्यात हा महामार्ग पूर्ण होईल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.