मुंबई : काँग्रेस नेते अशोक चव्हाण - अजित पवार यांच्यात महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत खडाजंगी झाल्याची बातमी आली होती, पण हे असं काहीही झालं नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. काही जण मुद्दाम अशा खोट्या बातम्या पसरवत आहेत. आमच्यात मतभेद व्हावेत यासाठी या बातम्या पसरवल्या जात असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 


ग्रामीण भागाशी संबंधित खात्याची मागणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी काँग्रेस नेते अशोक चव्हाण - अजित पवार यांच्यात महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत खडाजंगी झाल्याचं सांगण्यात येत होतं. अजित पवारांबरोबर वाद झाल्यानंतर अशोक चव्हाण बैठकीतून बाहेर पडले. ग्रामीण भागाशी संबंधित कृषी, ग्रामविकास किंवा सहकार खातं मिळावं यासाठी काँग्रेस बुधवारपासून आग्रही आहे.


आग्रहानंतर संताप


काल रात्री मेघदूत बंगल्यावर झालेल्या बैठकीतही अशोक चव्हाण यांनी काँग्रेसकडून याबाबत आग्रह धरला, त्यावर अजित पवार संतापले, तुमच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेतून खाते वाटप झालं आहे, पृथ्वीराज चव्हाण संयमी नेते आहेत, ते चर्चेवेळी उपस्थित होते, असे अजित पवारांनी अशोक चव्हाण यांना सुनावले असल्याचं सांगण्यात येतं.


बैठकीतून अशोक चव्हाण बाहेर पडले


तुमचे नेते नक्की कोण त्यांच्याशी पुन्हा चर्चा करा आणि काय ते ठरवा, असेही अजित पवारांनी सुनावले.  त्यावर मी काँग्रेसचा नेता आहे, मी माजी मुख्यमंत्री आहे, मी जबाबदारीने बोलतोय असे अजित पवार यांना सुनावत अशोक चव्हाण बैठकीतून बाहेर पडले असल्याचं सांगण्यात आलं.


आमचे खूप चांगले संबंध, वाद झालाच नाही- अजित पवार


पण यावर अजित पवार यांनी म्हटलं आहे, अशोक चव्हाण हे एक ज्येष्ठ नेते आहेत, ते मुख्यमंत्री असताना मी त्यांच्यासोबत एक मंत्री म्हणून काम केलं आहे. आमच्यात खूप चांगले संबंध आहेत, निराधार बातम्या देऊन काहीजण आमच्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, ते योग्य नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.


तर ग्रामीण भागाशी संबंधित खात्याची मागणी कायम


तर दुसरीकडे ग्रामीण भागाशी संबंधित एक तरी खातं आम्हाला मिळावं, ही आमची मागणी आजही कायम असल्याचं काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.