मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे डोळे लावून बसलेल्या नारायण राणेंना आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे. हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराविषयी चर्चा झालेली नसल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्याचे निवासस्थान वर्षांवर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. सुमारे ३ तास चाललेल्या या बैठकीला पक्षाच्या संघटनमंत्र्यासह वरिष्ठ मंत्री आणि नेते उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त ठिकाणी पक्षाचे सरपंच निवडून आल्याचा दावा भाजपाने केला आहे. तेव्हा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुण्यात एक दिवसाचे सरपंचांचे अधिवेशन घेण्याचा निर्णय भाजपाच्या कोअर कमिटी बैठकीत घेतला आहे.


आगामी काळातील ठाणे जिल्हा परिषद निवडणूक, नगर परिषद निवडणुका यांच्या जवाबदारीबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचं पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. आधी निर्णय झाल्याप्रमाणे राज्यात पक्षाचे किती प्रचारक बाहेर पडले, प्रचार केला का ?, प्रत्येक जिल्ह्यात पक्षाच्या कार्यालयांची स्थिती काय.. अशा संघटनेसंदर्भातल्या गोष्टींबाबत चर्चा झाली.