मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी ब्रेक लागला आहे. पुरेशा लस साठ्याअभावी उद्या गुरुवारीही (21 जुलै) मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद राहणार असल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पुरेशा प्रमाणात लसपुरवठा होत नसल्याने लसीकरणात सातत्याने अडथळे येत असल्याचं पाहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेला आज रात्री उशिरा पर्यंत लससाठा प्राप्त होणार आहे. त्याचं वितरण उद्या  दिवसभरात सर्व शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांना करण्यात येणार आहे.


महानगरपालिकेला, कोविशिल्डचे 50 हजार तर कोवॅक्सिनचे 11 हजार 200 असे एकूण 61 हजार 200 डोस प्राप्त होणार आहेत. हा लससाठा उपलब्ध झाल्यानंतर त्याचे उद्या दिवसभरात वितरण केलं जाईल. त्यामुळे उद्या (दिनांक 22 जुलै 2021) मुंबईत लसीकरण होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.  पण, शुक्रवारी म्हणजे 23 जुलैला मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण सुरू होणार आहे. 


मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.


दरम्यान, लसीचे डोस नसल्याने लसीकरण केंद्रावर गोंधळ पाहायला मिळत आहे. अनेक तास थांबूनही लस मिळत नसल्याने नागरिकांची कोंडीही झाली आहे. काहींना दुसऱ्या डोसची मुदत संपून लस मिळत नसल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत.