दीपक भातुसे, प्रतिनिधी झी मीडिया, मुंबई : नारायण राणे उद्या पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट करणार असले तरी राणेंच्या भाजपा प्रवेशाचा मुहुर्त अद्याप निश्चित झाला नसल्याचे भाजपाचे वरिष्ठ नेते सांगत आहेत. राणेंच्या प्रवेशाच्या हालचालीही भाजपामध्ये सध्या दिसत नाहीत. त्यामुळे उद्या घटस्थापनेच्या दिवशी राणे काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे राज्याला पावसाने झोपडले असताना दुसरीकडे सिंधुदुर्गसह राज्याच्या राजकीय वर्तुळात नारायण राणे भाजपात कधी जाणार हीच चर्चा सुरू आहे. १२ एप्रिल २०१७ रोजी राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अहमदाबाद येथे अमित शहांची भेट घेतली होती. त्यानंतर जुलैमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक संपली की राणेंचा भाजपा प्रवेश होईल असं बोललं जात होतं.


जुलैचा मुहुर्त टळल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई भेटीत राणे भाजपात जातील अशी नवी चर्चा सुरू झाली. मात्र तसे न झाल्याने आता नवरात्रीच्या नव्या मुहुर्ताची चर्चा सुरू झाली आहे. जसजसा भाजपा प्रवेश लाबतोय तसतशी राणेंची चिंताही वाढताना दिसतेय. तर दुसरीकडे राणे भाजपात जाणारच हे गृहित धरून काँग्रेसनं त्यांना टाळणं सुरू केलंय.


भाजपानेही राणेंना झुलवायचं ठरवलं आहे की काय असा प्रश्न पडतोय. कारण मागील सहा महिने राणे भाजपात जाणार अशी चर्चा सुरू असताना भाजपाने अद्याप राणेंच्या प्रवेशाचा मुहुर्त निश्चित केलेला नाही. एवढंच नव्हे तर भाजपातील वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राणेंचं पक्षात पुनर्वसन कसं करायचं तेही निश्चित झालं नसल्याचं सांगितलं जातंय.


आपण घटस्थापनेला २१ सप्टेंबर रोजी महत्त्वाची घोषणा करणार असल्याचं राणेंनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केलंय. मात्र बार्गेनिंग पॉवर संपली असल्याने वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेण्यावाचून राणेंपुढे पर्याय नाही. आता कोकणात आपली ताकद दाखवण्यासाठी स्वतःचे पॅनल उभं करून ग्रामपंचायती निवडणुका लढवण्याची घोषणा राणेंनी केलीय.


दुसरीकडे भाजपाकडून ठोस आश्वासन मिळत नसल्यानं एकीकडे काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वावर टीका करतानाच मी अजूनही काँग्रेसमध्येच असल्याचा सावध पवित्राही राणे घेत आहेत. भाजपानं झुलवत ठेवल्याने राणेंना पुढील मार्ग दिसत नसल्यानं पुढं करायचं काय असा प्रश्न कदाचित राणेंसमोर असेल. त्यामुळे घटस्थापनेला राणे आपलं अस्तित्व दाखवण्याची धडपड करण्याची शक्यता आहे.


नारायण राणेंचा भाजपा प्रवेशाचा मुहुर्त पक्षाचे अध्यक्ष अमित शहा ठरवणार असून त्यांनी अद्याप हा मुहुर्त निश्चित केला नसल्याचे भाजपाचे नेते सांगत आहेत. त्यामुळे राणेंची पुढील राजकीय वाटचाल आणि भवितव्याबाबत अद्यापही संभ्रम आहे. जोपर्यंत राणेंचा भाजपा प्रवेश होत नाही, तोपर्यंत हा संभ्रम कायम राहणार आहे.