काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये कोणताही विसंवाद नाही- संजय राऊत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पण त्याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्रिपद आणि विधानसभा अध्यक्षपदावरून विसंवाद असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मात्र तिन्ही पक्षांमध्ये कोणताही विसंवाद नसल्याचं सांगितलं आहे. जर एखाद्या गोष्टीवर मतभेद होताना दिसत असतील, तर उद्धव ठाकरे, शरद पवार, अहमद पटेल आणि मल्लिकार्जुन खरगे एकत्र बसून निर्णय घेतात, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसला तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालं आहे, असं संजय राऊत म्हणाले. विधानसभा अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादीचा आक्षेप असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत, त्यावरही राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. विधानसभा अध्यक्ष हा संपूर्ण सभागृहाचा असतो, एका पक्षाचा नसतो. विधानसभा अध्यक्षाचा संवाद प्रत्येक सदस्याची असावा लागतो, त्यामुळे अध्यक्ष कोणाला निवडायचं हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन ठरवतील, असं वक्तव्य राऊत यांनी केलं.
संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये यासाठी अनेक डावपेच आखले गेल्याचा आरोप राऊतांनी केला. त्यामुळे शिवसेनेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचं ते म्हणाले. तसंच हे सरकार ५ वर्ष टिकेल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. तपास यंत्रणांचा गैरवापर करुन कितीही चौकश्या केल्या, तर चौकश्यांना सडेतोड उत्तर देऊ, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. तसंच आम्ही सुडाचं राजकारण करणार नाही, असं विधान राऊत यांनी केलं. पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या असून सहकार्य करण्याचं आश्वासन दिल्याचं राऊत म्हणाले..
आदित्य ठाकरेंना मंत्रिपद मिळणार का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. तेव्हा याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं उत्तर राऊत यांनी दिलं.
महाविकासआघाडीकडून आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची आणि तिन्ही पक्षांचे २ असे एकूण ७ जण शपथ घेणार आहेत. शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत छगन भुजबळ शपथ घेणार आहेत. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण शपथ घेतील.