`तोकडी पॅन्ट, स्लीव्हलेस कपडे घातले तर बलात्कार होईल`
वसतीगृहातल्या वॉर्डनवर नुकतीच निलंबनाची कारवाई झालीय
दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबईतलं श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी म्हणजेच एसएनडीटी विद्यापीठ सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. विद्यार्थीनींच्या विनयभंगाप्रकरणी वसतीगृहाच्या वॉर्डनला तात्पुरते निलंबित केले असले तरी या वसतिगृहात अनेक समस्या कायम आहेत. या वसतिगृहात मुलींवर जाचक निर्बंध घालण्यात आलेत.
एसएनडीटी विद्यापीठाच्या जुहू कॅम्पसमधले नियम तुम्ही ऐकले तर तुम्हालाही धक्का बसेल. विद्यापीठ जरी केवळ मुलींच्या शिक्षणासाठी असलं तरी इथेही मुली स्वतंत्र नाहीत. वसतीगृहाच्या मेसमध्ये मुलं काम करतात म्हणून मुलींना इथे स्लीव्हलेस कपडे आणि तोकडी पॅन्ट घालण्यास मनाई आहे. इतकंच काय तर फोनवर जास्त वेळ बोलला तर संशयाने प्रश्नही विचारले जातात.
आम्ही कमी कपडे घातले तर आमच्यावर रेप होईल, असं बोललं जातं... आमच्यावर खूप बंधनं आहे स्लिव्हलेस घातले तर शाल घ्यावी लागते संशयाने पाहिले जाते... असं इथल्या विद्यार्थीनींनी म्हटलंय.
वसतीगृहातल्या वॉर्डनवर नुकतीच निलंबनाची कारवाई झालीय. स्लिव्हलेस कपड्यांवरुन सुरु झालेला हा वाद विनयभंगापर्यंत पोहचल्याची तक्रार आहे.
विद्यार्थिनींच्या या तक्रारी विद्यापीठ प्रशासनाला माहिती असल्या तरी त्यावर निर्बंध आलेले नाहीत. याविषयी विचार सुरु असल्याचे प्रशासनाने सांगितले.
मुलींना शिक्षण घेता यावं .. त्यांनी स्वत:च्या पायावर उभं रहावं या हेतूनं केवळ मुलींचे विद्यापीठ म्हणून एसएनडीटी सुरु करण्यात आलं. पण १०२ वर्षांचा शैक्षणिक वारसा असूनही मुलींच्या हक्काच्या महाविद्यालयात मुली स्वतंत्र नाहीत, हे दुर्देवच म्हणावं लागेल.