मुंबई: मध्य प्रदेशातील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु होणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, कोणाच्याही बापात महाराष्ट्रातील सरकार पाडायची हिंमत नाही, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्यांनी आमदारांची फोडाफोडी करणाऱ्या भाजप नेत्यांना फैलावर घेतले. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्वत:हून राजीनामा दिला, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मात्र, कोरोनासारखे संकट समोर असताना आमदारांची अशाप्रकारे फोडाफोडी करणे योग्य नाही, असे राऊत यांनी म्हटले. महाराष्ट्रात असे काहीही घडणार नाही. कोणाच्याही बापात महाराष्ट्रातील सरकार पाडायची हिंमत नाही, असे राऊत यांनी सांगितले. 

तसेच कोरोनाच्या संकटावेळी राजकारण करू पाहणाऱ्या भाजप नेत्यांनाही राऊत यांनी फटकारले. कोरोनावरून राजकारण करणाऱ्या राज्यातील  भाजप नेत्यांना  म्हाळगी प्रबोधिनीमध्ये क्वारंटाईन करावे, असा टोला त्यांनी लगावला. कोरोनासारख्या संकटाच्या काळात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान हवेत, असे आम्हीदेखील म्हणतो. ही राजकारण करण्याची वेळ नाही. महाराष्ट्रात मतभेद विसरून काम करण्याची गरज आहे. मात्र, भाजपला राजकारणच करायचे असेल तर त्यांना विरोधी पक्षातही बसण्याचा अधिकार नाही, असे राऊत यांनी म्हटले. यावेळी त्यांनी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीविषयीही टिप्पणी केली. रंजन गोगोई आणि आमदारांना अशाप्रकारे प्रलोभने दाखवणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. 


मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपच्या गोटात दाखल झाले होते. यानंतर त्यांच्या २२ समर्थक आमदारांनी राजीनामे दिले होते. यामुळे मध्य प्रदेश विधानसभेत काठावरचे बहुमत असलेले कमलनाथ सरकार अल्पमतात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने आज विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यापूर्वीच कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत या लढाईतून माघार घेतली.