मुंबई : राजकारणात कोणीही कायमचा शत्रू आणि मित्र नसतो, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी केले आहे. निवडणुकीचे युद्ध संपले आहे. आता तहाची बोलणी सुरू आहे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून सर्व पाहत असल्याचा टोला त्यांनी भाजप-शिवसेनेला लगावला. दरम्यान, भाजपकडून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असे जाहीर करण्यात आले आहे. तर शिवसेनेने ५०-५० सत्तेत वाटा हवा असे सांगत युतीची बोलणी होण्याआधीच भाजपला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुख्यमंत्री पदावरुन जोरदार रस्सीखेच युतीत असल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी शिवसेनेने आम्हाला पाप करायला भाग पाडू नका, असा इशारा दिला. त्यानंतर अजित पवार यांचे विधान आणि नवाब मलिक यांनी सरकार पडले तर पुढचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे अजित पवारांच्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुका झाल्यानंतर महायुतीला जनतेने कौल देताना धोक्याचा इशाराही दिला आहे. युतीला स्पष्ट बहुमत असताना राज्यात सत्ता स्थापेसाठी भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून राजकारण तापले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी एक सूचक विधान केल्याने राज्यात राजकारण बदलू शकते, अशी चर्चा आहे. भविष्यात राज्यात सत्तेचे नवे समीरकरण पाहायला मिळू शकते, अशी चर्चा सुरू आहे.


राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असे अजित पवार म्हणालेत. तसेच, राष्ट्रवादी विरोधी पक्षातच बसणार असल्याचे सांगत, भाजप – सेनेच काय ठरले आहे, हे त्यांनाच माहीत. आम्ही सरकारच्या चुका दाखवण्याचे काम करू, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनी भाऊबीजनिमित्त एक लाख महिलांना साडी वाटप केल्यावरूनही टीका केली.