मुंबई : मुंबईतील फ्लायओव्हरच्या खालची जागा आता 'नो पार्किंग झोन' म्हणून घोषित करण्यात आलीय. राज्य सरकारनं ही माहिती मुंबई हायकोर्टात दिलीय. यापुढे मुंबईतील फ्लाय ओव्हरच्या खाली गाड्या पार्क करणा-यांवर कारवाई करण्याचे निर्देश वाहतूक पोलिसांना देण्यात आलेत असंही राज्य सरकारनं स्पष्ट केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर मुंबईच्या रस्त्यांवर आज वाहनं चालवण्यास जागा नाही अशी परिस्थिती असताना पार्किंगची समस्या हा गंभीर मुद्दा बनलाय. त्यामुळे राज्य सरकारकडनं सकारात्मक योजना अपेक्षित असताना राज्य सरकारच्या वतीनं फ्लायओव्हरच्या खाली नो पार्किंग झोन घोषित करून स्वत:चं अंग काढून घेतलंय.


यासंदर्भात मुंबईतील रहिवासी प्रणव पोळेकर यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांचा दावा होता की, फ्लायओव्हरखाली वाहनतळ उभारणं ही मुंबईकरांची सुरक्षा धोक्यात टाकण्या सारखं आहे. दहशतवाद्यांनी मनात आणलं तर मोठा घातपात होऊ शकतो.


या प्रकरणाची गंभीर दखल घेत हायकोर्टानं राज्य सरकारला यासंदर्भात उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य सरकारच्या या उत्तरानंतर याचिकाकर्त्यांची याचिका दाखल करण्यामागचा हेतू साध्य झाल्यानं हायकोर्टानं ही याचिका निकाली काढलीय.