फेरीवाल्यांसाठीच्या काँग्रेसच्या मोर्चाला परवानगी नाही
फेरीवाल्यांच्या समर्थनासाठी उद्या बुधवारी दादरमध्ये काढण्यात येणा-या काँग्रेसच्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारलीय.
मुंबई : फेरीवाल्यांच्या समर्थनासाठी उद्या बुधवारी दादरमध्ये काढण्यात येणा-या काँग्रेसच्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारलीय. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांच्या नेतृत्वाखाली डिसिल्व्हा हायस्कूल ते कबुरतखाना असा मोर्चा काढण्यात येणार होता. पण कायदा सुव्यवस्थेच्या कारणामुळं पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं समजतंय.
गेल्या काही दिवसांपासून फेरीवाले विरूद्ध मनसे असा संघर्ष पेटलाय. फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेनं केलेलं खळ्ळ खटॅक आंदोलन आणि मनसे विभागप्रमुखाला फेरीवाल्यांनी केलेली मारहाण यामुळं वातावरण तापलंय.
काँग्रेसनं मोर्चा काढल्यास कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा इशारा मनसेनं दिला होता. मनसे विरूद्ध काँग्रेस असा संघर्ष टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारलीय. दरम्यान, मोर्चा न काढता एकाच ठिकाणी निदर्शन करण्यास परवानगी मिळू शकते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिलीय.