माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा नाहीच, पुन्हा कोठडीत वाढ
अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ करण्या आली आहे.
मुंबई : अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडी 11 ऑक्टोबरपर्यंत वाढली आहे. ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात देशमुख यांना मागील वर्षी 2 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. शंभर कोटी वसुली प्रकरणात त्यांना अटक झाली होती. (Anil Deshmukh judicial custody extended again by 14 days)
कालच सर्वोच्च न्यायालयाने मुंबई हायकोर्टाला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर तातडीनं सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर लवकर सुनावणी होत नसल्याने त्यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता. त्यानंतर तातडीनं सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते.
सुप्रीम कोर्टाने अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश दिल्यानतंर त्यांना दिलासा मिळेल असं वाटतं होतं. पण तसं झालं नाही. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी वाढ झाली आहे.
काय आहे प्रकरण?
मार्च 2021 मध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir singh) यांनी देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख (Anil deshmukh) यांनी पोलीस अधिकाऱ्यांना मुंबईतील रेस्टॉरंट व बार मालकांकडून दरमहिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता.
सीबीआयने गेल्यावर्षी एप्रिलमध्ये अनिल देशमुख आणि सचिन वाझे (Sachin vaze) यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. उच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.