मुंबई : देशात उद्यापासून 18 वर्ष वयोगटातील नागरिकांना मोफत लस उपलब्ध करुन दिली जाणार आहे. पण मुंबईत मात्र 18 ते 29 वयोगटातील लसीकरण होणार नाहीए. गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. मुंबईत उद्यापासून केवळ 30 वर्ष वयोगटावरील व्यक्तींचं लसिकरण सुरु राहणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. 249 सेंटरवर 30 वयोगटावरील व्यक्तींचे 50% वॉक इन आणि 50% ऑनलाईन रजिस्ट्रेशन करुन लसीकरण होणार आहे. 7 सेंटरवर परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण असेल. तसंच, काही सेंटरवर कोवॅक्सिनचे दुसरे डोस दिले जाणार आहेत.


देशात उद्यापासू 18 वर्षांपुढील नागरिकांचं लसीकरण
दरम्यान, देशात उद्यापासून 18 वर्षांपुढील नागरिकांना मोफत लस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 7 जून रोजी याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार राज्यांना लशीची निर्मिती करणाऱ्या कंपनींकडून लस खरेदी करण्याची आवश्यकता राहणार नाही. केंद्र 75 टक्के लशींची खरेदी करणार असून राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना मोफत वितरण करणार आहे. लोकसंख्या, कोरोना रुग्णांची संख्या आणि लसीकरण या आधारावर लशी पुरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला आहे.