Mumbai Coastal Road: महापालिकेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणजे सागरी किनारा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. त्याचबरोबर आता कोस्टल रोडचा पुढचा टप्पादेखील लवकरच खुला करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. कोस्टल रोडचे काम 90 टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले आहे. या रस्त्याचे दोन्ही बोगदेदेखील नागरिकांना वाहतुकीसाठी खुले केले आहेत. त्यानंतर आता वांद्रे-वरळी सी-लिंक ते कोस्टल रोड असा पुढचा महत्त्वाचा टप्पा पालिका लवकरच सुरू करणार आहे. 11 जुलै रोजी कोस्टल रोडचा हाजी अली ते वरळी हा टप्पा सुरू होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोस्टल रोडच्या उत्तर मार्गिकेचा आणखी एक भाग काही प्रमाणात खुला केला जाणार आहे. वांद्रे वरळी सी-लिंकच्या आधी असणारा हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंतचा साडेतीन किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या आधी मरीन ड्राईव्ह ते हाजी अलीपर्यंतची मार्गिका खुली करण्यात आली होती. ही मार्गिका खुली करण्यात आल्यानंतर मरीन ड्राइव्ह ते वरळीपर्यंतचा थेट प्रवास करता येणार आहे. 


कोस्टल रोडची कामे टप्प्या टप्प्याने पूर्ण केली जात आहेत. 10.58 किमीचा कोस्टल रोड आणि 4.5 लांबीचा वांद्रे-वरळी सी लिंक यांना जोडणाऱ्या गर्डरचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळं वांद्रे ते दक्षिण मुंबई असा पाऊण तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पामुळं 70 टक्के प्रवासाचा वेळ वाचणार आहे. त्याचबरोबर 34 टक्के इंधनाचा बचत देखील होणार आहे. कोस्टल रोडमुळं पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कमी होण्यासही मदत होणार आहे. वरळी सी लिंकचा मार्गदेखील 15 ऑगस्टपर्यंत खुला होण्याची शक्यता आहे.



कोस्टल रोडचा हजी आली ते वरळीचा खान अब्दुल गफार खान पर्यंतचा उत्तर दिशेने जाणारा साडेतीन किलोमीटरच्या मार्गीका गुरुवार 11 जुलैपासून सुरू करण्यात येणार, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 11 जुलै रोजी सकाळी 7 वाजल्यापासून हा टप्पा वाहतुकीसाठी खुला असेल. हा टप्पा आठवड्यात सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत वाहतुकीसाठी सुरू राहील. तर प्रकल्पातील उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने शनिवार आणि रविवार असे दोन दिवस बंद राहील.


दरम्यान, बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडच्या उत्तरवाहिनेच्या पाहणीचे काम केले. हाजी अली ते वरळी सी फेस किनारी रस्ता मार्गाच्या टप्प्याची साडेतीन किलोमीटर रस्त्याची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. आजपासून सकाळी सातपासून हा रस्ता खुला करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तर, वरळी ते सी लिंक हा जोडमार्ग पुढच्या तीन आठवड्यात पूर्ण होणार, अशीही माहिती समोर येतेय. या मार्गामुळं वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार असून मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.