मुंबई : आमची पंचवीस वर्ष युतीमध्ये सडली कारण आम्ही ओळखलं नव्हतं, हा मित्र नाही हा शत्रू आहे. पण हिंदुत्वाचा बुरखा फाटल्यानंतर त्याचा विद्रुप, बेसूर आणि भेसूर चेहरा आम्ही बघतोय. अजून आमचा विश्वास बसत नाहीए, हाच का तो मित्र ज्याला आम्ही जोपासलं होतं, ज्याला आम्ही डोक्यावर घेऊन नाचत होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किती भयानक पद्धतीने आणि वाईट पद्धतीने आता भाजप अंगावर येत आहेत. आम्ही कधी खालच्या भाषेत सामनात मोदींचा अपमान केला आहे का? ही जर बाळासाहेबांची शिवसेना नसेल तर तुमचा भाजप तरी अटलजींचा राहिला आहे का? संवेदशनील भाजप आता गेला कुठे?


खोटं बोलणं हे त्यांच्या हिंदुत्वात बसतं, आपल्या हिंदुत्वात बसत नाही. जम्मू - काश्मिरमध्ये राहुल भट या कर्मचाऱ्याला कार्यालयात घुसून गोळ्या घातल्या. आता काय त्या कार्यालयासमोर हनुमान चालिसा म्हणायचं, की घंटा मोर्चा काढायचा?


काश्मिर पंडित म्हणतायत आम्हाला बळीचा बकरा बनवला जातंय, हे काश्मिर फाईल्सचं पुढचं पाऊल आहे का? का नाही बोलत यावर, का नाही बोलत महागाईवर. गॅस सिलेंडर हजारावर गेलाय. लाज नाही, लज्ना नाही केवळ लोकांना भ्रमिष्ट करुन राज्य करत आहेत हे आमचं हिंदुत्व नाही.


यांचे सत्तेवरच्या एकतर्फी प्रेमातून महाराष्ट्र विद्रूप करण्याचं काम सुरू आहे. आम्ही काँग्रेससोबत गेलो तर आम्ही हिंदूत्व सोडलं. आम्ही काँग्रेससोबत गेलो ते उघड गेलो होतो. तुमच्यासारखा गुपचूप पहाटे शपथविधी आम्ही घेतला नाही.


बरं! काँगेससोबत गेलो. मग तुम्ही एनडीएमध्ये किती पक्ष जमवले होते? ज्यांचा एकही खासदार नव्हता असे पक्ष तुमच्या सोबत होते. ते सगळे हिंदुत्ववादी होते का? नितीश कुमार यांच्यासमोर हिंदुत्व बोलण्याची तुमची हिंमत आहे का? मेहबुबा मुफ्ती तुमच्या कानात वंदे मातरम बोलतात का? असे सवाल त्यांनी केले.


मला सत्ता असली नसली तरी काही फरक पडत नाही. पण, हिंदुत्व सुटणार नाही. सरकारपेक्षा जास्त मजबूत इकडे शिवसैनिकांचे मावळे बसले आहेत. महागाई वाढली, लाज नाही, लज्जा नाही, कर्तृत्व नाही, हे तुमचं हिंदुत्व आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.