मुंबई : मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी नेते सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याची भूमिका ओबीसी नेत्यांनी मांडली आहे. ओबीसी नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. यावेळी मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असं ओबीसी नेत्यांनी सांगितलं आहे. मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती ओबीसी नेत्यांनी यावेळी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आलं आहे. आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला आहे. न्यायालयाने याचिकेवर मत ऐकून घेतलं नाही,' असं वक्तव्य माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केलं.


'मराठा आरक्षण आम्हाला मान्य नाही, त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत,' असं काँग्रेस आमदार हरीभाऊ राठोड म्हणाले.


'मराठा आरक्षणासाठी एकत्र आलेल्यांचा ओबीसी समाजाला संपवण्याचा प्रयत्न आहे. कुणबी आणि मराठा एक आहेत, असं मुळीच नाही. १० तासांमध्ये कायदा बदला, हे चूक आहे,' अशी प्रतिक्रिया कुणबी समाजाचे प्रतिनिधी चंद्रकांत बावकर यांनी दिली.