गणेश कवडे, मुंबई : देशभरात 1 जुलैपासून जीएसटी नवी कर प्रणाली लागू झाली आहे. यामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जकात नाके पूर्णपणे बंद झाले. त्यामुळे जकात नाक्यावर काम करण्या-या कर्मचा-यांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशांत जीएसटी ही नवी कर प्रणाली सुरू झाल्यानंतर मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जकात नाके बंद करण्यात आले. जकात नाक्यावर एकूण 2400 अधिकारी आणि कर्मचारी काम करत होते. आता या कर्मचा-यांना कोणत्या ठिकाणी बदली द्यायची असा प्रश्न महापालिका प्रशासनामध्ये निर्माण झाला होता. 


याठिकाणी काम करत असणा-या काही अधिकारी आणि कर्मचा-यांना लॉटरी पद्धतीने नोकरी देण्यात आली. तर काहींची कमी दर्जा असणा-या पदावर नेमणूक झालीय. तर करनिर्धाकर संचालक विभागात या अधिकारी आणि कर्मचा-यांना समाविष्ठ करून घ्यावं असे आदेश कोर्ट आणि महापौरांनी दिले होते. मात्र महापालिका आयुक्त कर्मचा-यांना सेवेत समाविष्ठ करून घेत नाही असा आरोप पालिका कर्मचा-यांनी केला आहे.


महासभेत महापौरांनी आदेश देऊनदेखील आयुक्त मनमानी कारभार करत आहेत. अनुभव असणा-या अधिकारी कर्मचा-यांना न घेता नवीन व्यक्तींना घेण्यात आलंय. त्यामुळे कर्मचारी ज्या पदावर होते त्याच पदावर त्याची नियुक्ती करावी अशी मागणी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केली आहे. आता या अधिकारी आणि कर्मचा-यांना महापालिका आयुक्त न्याय देतात का हे पाहणं गरजेचं आहे.