Crime News : बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेताना काही काळानंतर ती व्यक्ती भेटली नाही तर त्यांचा शोध सहसा थांबवला जातो. पोलीस अनेकदा अशा प्रकरणाच्या फायली कायमच्या बंद करुन टाकतात. मात्र ओडिशा पोलिसांनी (Odisha Police) केलेल्या एका कारवाईमुळे सध्या त्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. दहा वर्षांपूर्वी मुलीला घेऊन ओडिशातून फरार झालेल्या एका व्यक्तीला ओडिशा पोलिसांना मुंबई शेजारी असलेल्या ठाण्यातून (Thane Crime) अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी मात्र सत्य समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओडिशाच्या केंदुझार येथील रहिवासी असलेल्या प्रशांत नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी तब्बल 10 वर्षांनी अटक केली आहे. 29 जून 2023 रोजी ओडिशा पोलिसांनी आरोपी प्रशांतला ठाण्यातून ताब्यात घेतले होते. 2013 मध्ये प्रशांत त्याच्या पत्नीला मारहाण करून 3 वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन पळून गेला होता. तेव्हापासून पोलीस प्रशांत आणि त्याच्या मुलीचा शोध घेत होते. मात्र प्रशांतला पकडल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.


पोलिसांनी प्रशांतसोबत असलेली मुलगी कशी आहे याचीच चिंता होती. मात्र, सत्य परिस्थिती कळताच त्यांना धक्का बसला. ओडिशा पोलिसांचे एका निष्पाप मुलीचा जीव वाचवण्यासाठी इतकी वर्षे सुरू असलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. ओडिशा गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अरुण बोथरा यांनी याप्रकरणाबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे. "जेव्हा क्राइम ब्राँचच्या पोलिस उपअधीक्षक कल्पना साहू यांनी फोन केला आणि सांगितले की त्यांनी प्रशांतला अटक केली आहे, तेव्हा माझा पहिला प्रश्न होता की तुम्हाला त्यांची मुलगी सापडली का? पण कल्पना यांनी सांगितले की, प्रशांतने खूप आधीच मुलीची हत्या करून तिचा मृतदेह नदीत फेकून दिले होता. आम्ही दोघेही थोडा वेळ शांत बसलो. 10 वर्षे पाठलाग करून एखाद्याला अटक केल्याचा आनंद त्या शांततेत ओसरून गेला होता," असे ट्वीट अतिरिक्त पोलीस महासंचालक अरुण बोथरा यांनी केले आहे.



नेमकं प्रकरण काय?


आरोपी प्रशांतचे 2010 मध्ये लग्न झालं होतं. त्यानंतर काही दिवसांनी तो पत्नीसह कामासाठी महाराष्ट्रात निघून आला. पत्नी मनमिळाऊ असल्यामुळे प्रशांतला तिच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला. 2011 मध्ये जेव्हा त्याच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला तेव्हा प्रशांतने सरळ सांगितले की ते आपले मूल नाही. मुलीचा जन्म हे दोघांच्या भांडणाचे कारण ठरले. त्यानंतर 2013 मध्ये दोघांमध्ये एके दिवशी जोरदार भांडण झालं. त्यानंतर प्रशांतने पत्नीला एका खोलीत कोंडून ठेवले. त्यानंतर प्रशांत मुलीला घेऊन घरातून बाहेर पडला. घरातून बाहेर पडतानाच लोकांनी त्याला शेवटचे पाहिलं होतं. पत्नीने कसेबसे घराबाहेर पडत थेट पोलिसांत जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र प्रशांत काही सापडला नाही. पोलीस गेली 10 वर्षे त्याचा शोध घेत होते पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.


त्यानंतर ओडिशा पोलिसांनी मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात प्रशांतचा शोध घेण्यास सुरुवात केली. जून महिन्यात पोलिसांना प्रशांतच्या ठिकाणाची माहिती मिळाली. त्यानंतर ओडिशा क्राईम ब्राँचने स्थानिक पोलिसांच्या मदतीने प्रशांतला पकडले. पोलिसांना आशा होती की लहान मुलीचा चेहरा पाहून प्रशांतचे मन वळेल. पण तसे काहीच झाले नाही. प्रशांतने त्याच दिवशी चॉकलेट देण्याच्या बहाण्याने मुलीला घेऊन घरातून पळ काढला होता. त्यानंतर प्रशांतने मुलीला एक बैतरणी नदीवर नेले आणि तिला नदीत फेकून दिले. नदीत बुडण्यापूर्वी मुलगी खूप धडपड करत होती पण प्रशांत फक्त ते बघतच राहिला.