Pension Scheme News in Marathi : बऱ्याच काळापासून चर्चेचा मुद्दा ठरलेल्या पेन्शन (Pension Scheme News) प्रश्नावर आता काही अंशी तोडगा निघाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य शासनानं घेतलेल्या अतिशय महत्त्वाच्या निर्णयामुळं आता मोठ्या वर्गाला यामुळं दिलासा मिळणार असून, निवृत्तीवेतन घेणाऱ्यांना याचा थेट फायदा मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य शासकीय, निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या आणि वयाची 80 वर्षे पूर्ण केलेल्या किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या निवृत्तीवेतनात म्हणजेच पेन्शनच्या रकमेमध्ये 20 ते 100 टक्क्यापर्यंत निवृत्तिवेतनात वाढ  करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णायाचा लाभ 75 हजार निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. शासन निर्णयानुसार हा बदल 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आला आहे. 


हेसुद्धा पाहा : मुंबई  पुणे एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी बंद; पाहा कोणत्या वेळात तिथं जाणं टाळावं 


 


कैक वर्षांची मागणी मान्य... 


केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असणाऱ्या पेन्शन योजनेप्रमाणं राज्यातील 80 वर्षांवरील निवृत्तिवेतनधारकांना वाढीव निवृत्तिवेतन मिळण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. अखेर ही मागणी मान्य झाल्यानंतर कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आणि समस्त कर्मचारी वर्गाकडून शासनाचे आभार मानण्यात आले. 


कोणाला लागू असेल हा शासन निर्णय? 


राज्य शासकीय आणि जिल्हा परिषद, मान्यता तसंच अनुदानाप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठं त्यांच्याशी संलग्न असलेली महाविद्यालयं, पंचायत समिती, कृषी विद्यापीठांमधून सेवानिवृत्त झालेल्या 80 वर्षे आणि त्यापुढील वयाच्या निवृत्तिवेतनधारकांना आणि कुटुंबनिवृत्तिवेतनधारकांना हा शासन निर्णय लागू असेल. 


वरील विभागांमधून राज्यात सध्या सेवानिवृत्त अधिकारी आणि जवळपास ७ लाख कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये 10 टक्के ही निवृत्तीवेतनधारकांचं वय 80 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक असल्याची माहिती माहिती राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी दिली.


कशी असेल वाढीव निवृत्तीवेतनाची आकडेवारी आणि विभागणी? 


100 वर्षे किंवा त्याहून अधिक वय - 100 टक्के निवृत्तीवेतनवाढ 
95 ते 100 वर्षे - 50 टक्के निवृत्तीवेतनवाढ 
90 ते 95 वर्षे - 40 टक्के निवृत्तीवेतनवाढ 
85 ते 90 वर्षे वय - 30 टक्के निवृत्तीवेतनवाढ 
80 ते 85 वर्षे वय - 20 टक्के निवृत्तीवेतनवाढ