मुंबई : आदित्य ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जात असताना आणखी एक ठाकरे राजकारणात येणार की काय याची चर्चा सुरू झाली आहे. कोण आहेत हे नवे ठाकरे, लवकरच आणखी एक ठाकरे राजकारणात सक्रिय होणार आहेत अशी एक चर्चा सध्या सुरु झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रबोधनकार.... बाळासाहेब ठाकरे.... उद्धव ठाकरे... आदित्य ठाकरे... आणि आता आणखी एक ठाकरे मैदानात उतरणार.... ?


उद्धव ठाकरेंचा धाकटा मुलगा तेजस ठाकरे. तसा राजकारण हा त्यांचा पिंड नाही. पण अलीकडे ते जरा बाबांबरोबर, भावाबरोबर दिसू लागले आहेत. आदित्य ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली त्यावेळी वेळ साधत तेजसही व्यासपीठावर दिसले. नंतर उमेदवारी अर्ज भरतानाही भावाची भावाला साथ होती. उद्धव ठाकरेंच्या संगमनेरमधल्या सभेत तेजसना व्यासपीठावर येण्याचा आग्रह केला. आणि मग तेजस ठाकरेंचं स्वागत झालं ते कोण आला रे कोण आला... शिवसेनेचा वाघ आला, या घोषणांच्या साथीनं.


तेजस फक्त सभा पाहायला आलाय, तो जंगलात रमणारा आहे, असं उद्धव ठाकरेंनी लगेच स्पष्ट करुन टाकलं. तेजस ठाकरे सध्या तरी पर्यावरण आणि वन्यजीवांमध्ये रमणारे आहेत. पण राजकारणात कधीही काहीही घडूच शकतं. आणि खरं तर हीच आमची खरी शिवसेना, असं बाळासाहेब तेजसबद्दल म्हणायचे, त्याची यानिमित्तानं आठवण झाली.