मुंबई : महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना सर्व आपत्कालीन परिस्थितीत एकाच नंबरद्वारे संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. 


महाराष्ट्राला 112 हा नवा इमरजन्सी नंबर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेच्या 911 या एकाच इमरजन्सी नंबरप्रमाणे महाराष्ट्रालाही 112 हा नवा इमरजन्सी नंबर मिळणार आहे. सद्य स्थितीत नागरिकांना पोलिसांसाठी 100, फायरब्रिगेडसाठी 101 आणि अँब्युलन्स सेवेकरता 102 तसंच आपत्कालिन सेवेकरता 108 नंबर डायल करावा लागतो. मात्र आता या सगळ्या सुविधा एका 112 या नव्या इमरजन्सी नंबरवर नागरिकांना मिळू शकतात. 


सगळ्या आपत्कालीन सेवांसाठी हाच नंबर नागरिक वापरु शकतात. अमेरिकेत कोणत्याही सेवेकरता 911 हा एकच नंबर सध्या वापरात आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रालाही 112 हा नवा आपत्कालीन नंबर मिळणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत फोन कॉलसोबतच एसएमएस, ईमेल, अॅपवरील पॅनिक बटन आणि स्काईपच्या माध्यमातूनही संपर्क साधता येणार आहे. 


या अंतर्गत नागरिकांच्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी नवी मुंबई आणि नागपूरमध्ये कॉल सेंटर उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी 429 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.