मुंबई : परतीच्या पावसाचा मोठा फटका हा शेतमालावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. भातशेतीसोबतच कांद्याच्या पिकाचंही यामुळे मोठं नुकसान झालं आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून तेजीत असणाऱ्या कांद्याच्या दरांनी पुन्हा एकदा वेग पकडला आहे. सध्याच्या घडीला कांद्याचे दर शंभर रुपये प्रति किलो इतक्यांवर पोहोचले आहेत. मंगळवारी एक किलो कांद्यासाठी ८० रुपये मोजावे लागत होते. हेच दर अवघ्या एका दिवसांत थेट शंभरीच्या घरात पोहोचले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरकोळ आणि घाऊक बाजारातही कांद्याचे दर लक्षणीयरित्य वाढले आहेत. परतीच्या पावसामुळे नाशिक आणि जुन्नर या कांद्याची निर्यात केल्या जाणाऱ्या ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. ज्याचे पडसाद दरवाढीमध्ये उमटल्याचं दिसत आहे. 


दैनंदिन जीवनात स्वयंपाकामध्ये, विविध पदार्थ बनवतेवेळी कांद्याचा सर्रास वापर केला जातो. पण, आता मात्र कांद्याचे हे वाढलेले दर सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री लावणार असंच चित्र आहे. मुळात अनेकांच्या खर्चाची आखणीही या वाढीव दरांमुळे बिघडणार आहे. 



फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर कर्नाटक आणि इतरही अनेक राज्यांमध्ये लांबलेल्या आणि परतीच्या पावसामुळे कांद्याच्या पिकाला फटका बसला आहे. कांद्याशिवाय टोमॅटोच्या पिकाचंही नुकसान झालं आहे. भाज्यांच्या बाजारपेठेत पालेभाज्या, विशेषत: कोथिंबीरीच्या एका जुडीचे दरही ग्राहकांच्या भुवया उंचावून जात आहेत. त्यामुळे आता येत्या काळात हे दर कमी कधी होणार याकडेच सर्वसामान्यांचं लक्ष लागलेलं आहे.