नवी दिल्ली : पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले असतानाच कांदा हा बाजारपेठेतला अत्यंत दुर्मीळ पदार्थ ठरला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना अच्छे दिन तर, ग्राहकांच्या डोळ्यात पाणी अशी स्थिती बाजारात निर्माण झाली आहे. कांद्याच्या दराने सध्या पन्नाशी पार केली आहे. हा कांदा लवकरच शंभरी पार करतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केवळ कांदाच नव्हे तर, टोमॅटो, गाजर, वांगी, शेवगा शेंग, कोथिंबीर, कडीपत्ता, मेथी, पालक यांसारख्या भाज्याही भलत्याच कडाडल्या आहेत. येत्या काही काळात तरी कांद्याचे दर कमी होण्याची कोणतीच चिन्हे नाहीत. त्यामुळे कांद्याने डोळ्यात पाणी आणले तर, त्यासाठी ग्राहकांनी तयार रहायला हवे.


दुकानांमधून कांदा गायब


कांद्याचे दर कडाडल्यामुळे दुकानांमधूनही कांदा गायब झाला आहे. मुंबईत कांद्याचे दर गगनाला गवसनी घालत आहेत. तर, अशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नाशिकमध्येही कांदा ३२०० रूपये प्रतिक्विंटलवर पोहोचला आहे. या आधीही कांदा चढ्या भावाने विकला गेला असून, हे दर ४०४० प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते. मुंबईत अगदीच कांदा खराब असेल तर तोही ४० रूपये प्रति किलो दराने चालला आहे. हैदराबादमध्ये कांदा ५० रूपये, चंडीगढमध्ये ४४ रूपये तर, लखनऊमध्ये ४० ते ४२ रूपये प्रति किलो दराने विकला जात आहे.
कांद्याच्या साठ्याची मर्यादा वाढवली


दरम्यान, कांद्यांच्या वाढत्या दरावर अंकूश लावण्यासाठी सरकारने कांद्याच्या साठ्याच्या मर्यादेत वाढ करून ती डिसेंबर पर्यंत वाढवली आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांनी म्हटले आहे की, कांद्याची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने ही मर्यादा ३१ ऑक्टोबर २०१७ वरून ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत वाढवली आहे.