मुंबई : देशामध्ये विविध ठिकाणी घातपाताच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरुन काही संशयीत व्यक्तींना दिल्ली पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामधल्या एका व्यक्तीचा समावेश आहे. यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज तातडीची बैठक घेतली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे, गृह अप्पर मुख्. सचिव मनुकुमार श्रीवास्तव, एटीएस प्रमुख विनित अग्रवाल, जॉईंट सीपी राजकुमार व्हटकर यासह काही वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थितित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बैठकीनंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्रातून अटक  करण्यात आलेल्या व्यक्तीच्या संदर्भात पोलिसांनी मला माहिती दिलेली आहे. अजून पूर्ण माहिती मिळण्यासाठी वेळ लागणार आहे. यासंदर्भात एटीएसकडूनदुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन आणखी माहिती देण्यात येणार आहे, असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.


इंटेलिजन्स फेल्युअर नाही


महाराष्ट्रात येऊन दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने कारवाई केली, महाराष्ट्राचं एटीएस पथक झोपलं होतं का, हा इंटेलिजन्स फेल्युअर आहे, अशी टीका भाजपने केली होती. यावर बोलताना गृहमंत्र्यांनी हा  इंटेलेजन्स फेल्युअर आहे असं मी म्हणणार नाही, यातले बारकावे मला सांगता येणार नाहीत, कारण त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो. एटीएसचे या संपूर्ण प्रकरणावर लक्ष आहे, त्यामुळे इंटेलिजन्स फेल्युअर नाही असं स्पष्ट केलं.


विरोधकांच्या टीकेला उत्तर


तसंच ही घटना अतिशय सेन्सेटिव्ह आहे, त्यामुळे याप्रकरणात पोलिसांना त्यांच्यापद्धतीने तपास करु द्यावा, तपासातून जे सत्य समोर येईल आपल्या सर्वांसमोर असले. असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे


कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याच्या आधी ज्या परिस्थितीतून आपण जात आहोत, त्या परिस्थितीत सर्वांनी पोलिसांनी मदत केली पाहिजे, सरकारविरोधात आंदोलनं करण्यापेक्षा सरकारला, पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे, पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, त्यांना दुसऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी अडकवून ठेवलेलं नाही असंही गृहमंत्र्यांनी सुनावलं आहे.