मुंबई : जवळपास संपूर्ण देशाचं ज्या क्षणाकडे लक्ष लागलेलं होतं तो दिवस उजाडला आणि अयोध्येमध्ये अखेर राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि काही मोजक्या आमंत्रितांनी अयोध्येत या सोहळ्याचा अनुभव घेतला. तर, इथं मुंबईत आणि साऱ्या देशभरातही उत्साहाचीच लाट पाहायला मिळाली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम मंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्याला हजेरी लावता आली नसली तरीही अनेकांनी आपल्या परिनं या सोहळ्यात सहभागी होत या क्षणाचा आनंद लुटला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेसुद्धा यापैकीच एक.


कोरोना काळातील काही आव्हानं आणि केंद्रानं आखलेली नियमावली या साऱ्याचं पालन करत, सावधगिरी बाळगत भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी फार कमी जणांची हजेरी होती. पण, तिथं जाणं शक्य झालं नसलं तरीही फडणवीसांनी मुंबईतील भाजप कार्यालयात आपला आनंद साजरा केला.



एक कारसेवक म्हणूनही ओळख असणाऱ्या फडणवीस यांचा आनंद यावेळी गगनात मावेनासा झाल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेला व्हिडिओ पाहून लक्षात येत आहे. व्हिडिओ पाहता फडणवीस राम नामाचा जप करत भक्तिरसात तल्लिन झाल्याचं दिसत आहे. अतिशय वेगळ्या आणि तितक्याच अद्वितीय अशा या माहोलामध्ये सारा देश न्हाऊन निघाला आहे. इतकंच नव्हे, तर परदेशातही याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळत आहे.