पंकज भुजबळांनी घेतली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ मातोश्रीवर दाखल झाले आहेत.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ मातोश्रीवर दाखल झाले आहेत, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची ते भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याआधी सकाळी पंकज भुजबळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील भेट घेतल्याचं कळतं आहे. छगन भुजबळ यांना व्यक्त केलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांचे आभार मानल्याचं बोललं जातंय.
दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जर छगन भुजबळ हे आज शिवसेनेत राहिले असते, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती, छगन भुजबळ हे राजकीय विरोधक आहेत, पण आमचं त्यांच्याशी वैयक्तिक शत्रुत्व नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ हे मातोश्रीवर दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. छगन भुजबळ यांच्या सुटकेनंतर पहिल्यांदाच भुजबळ परिवारातील व्यक्ती मातोश्रीवर दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र या भेटीचं कारण अजून समजू शकलेलं नाही.
शिवसेनेचं आणि छगन भुजबळांचं नातं तसं फार जुनं आणि जिव्हाळ्याचं देखील होतं, छगन भुजबळ हे शिवसेनेचे पहिले महापौर होते, भुजबळांनी २५ वर्षे शिवसेनेसोबत काम केलं. भुजबळांनी शिवसेनेचा नगरसेवक, महापौर आणि आमदार अशी सर्व पदं भूषवली, भुजबळांनी शिवसेना सोडली होती, तेव्हा शिवसैनिकांनी छगन भुजबळांवर केलेला हल्ला, हा चर्चेचा विषय होता. यानंतर छगन भुजबळ राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना, याच काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अटकेचं वारंट निघालं होतं.