मुख्यमंत्र्यांवरच्या नाराजीच्या चर्चेवर पंकजा मुंडे म्हणतात...
अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावण्यास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यानं महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
मुंबई : अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावण्यास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यानं महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र पंकजा मुंडे यांनी त्याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला. गोपीनाथ मुंडे आणि एका रडवेल्या बाळाचा फोटो पंकजा मुंडेंनी बुधवारी फेसबुकवर पोस्ट केला. बाबा, मला तुमची उणीव सतत जाणवते असं भावनिक वाक्यही त्यांनी या पोस्टमध्ये टाकलं.
पंकजा मुंडेंनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमुळे पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चेला तोंड फुटलं होतं. कारण शिवसेनेसह विरोधकांनीही अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावण्यास विरोध करताना, विधीमंडळाचं कामकाज रोखून धरलं होतं. तर मेस्मा लागू करणं योग्य असल्याच्या आक्रमक भूमिकेवर पंकजा मुंडे ठाम होत्या. मात्र गुरूवारी सकाळी पंकजा मुंडेंशी चर्चा न करताच मुख्यमंत्र्यांनी मेस्माला स्थगिती दिली. त्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जाऊ लागलं. त्यावर दुरध्वनीवरुन झी 24 तासशी बोलताना, पंकजा मुंडेंनी आपल्या नाराजीबाबतचे सर्व तर्कवितर्क फेटाळून लावले.