मुंबई : पत्रकार आणि सामजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश तसंच ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे आणि ज्येष्ठ लेखक एम. एम. कलबुर्गी यांची हत्या एकाच पिस्तुलानं झाल्याचं या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकानं म्हटलंय. मात्र हे पिस्तुल अजून पथकाच्या हाती लागलेलं नाही. तसंच गौरी लंकेश यांची हत्या या प्रकरणात अटक झालेल्या परशूराम वाघमारे यानेच केल्याचंही या पथकाने म्हटलंय. ज्या टोळीसाठी ही हत्या करण्यात आली त्या टोळीची पाळमुळं जवळपास पाच राज्यात पसरल्याचं या पथकातल्या अधिकाऱ्याने म्हटलंय.


उजव्या विचारधारेसाठी काम 


 या टोळीला कोणतंही नाव देण्यात आलेलं नाही. उजव्या विचारधारेसाठी ही संघटना काम करते. मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या पाच राज्यात या टोळीची पाळमूळं आहेत. या टोळीत महाराष्ट्रातल्या हिंदू जागृती समिती आणि सनातन संस्थेची माणसं भरती होत असली तरी या दोन संस्थांनी थेट हत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसत नाही असं या अधिकाऱ्याने म्हटलंय.