मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांना फरार घोषित करण्यात आलं आहेत. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाकडून त्यांना फरार घोषित करण्यात आलं आहे. त्यानंतर आता परमबीर सिंग यांच्या मालमत्तांबाबत पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परमबीर सिंग यांची कोट्यवधीची मालमत्ता असून मुंबईतल्या जुहूत आयपीएस अधिकाऱ्यांनी उभारलेल्या वसुंधरा सोसाटीत तब्बल 2500 स्क्वेअर फुटांचा अलिशान फ्लॅट आहे. या फ्लॅटची किंमत सुमारे पाच कोटी असून अनेक वर्षांपासून हा फ्लॅट भाड्यानं दिला आहे. यातून त्यांना महिन्याला लाखो रुपयांचं उत्पन्न येत असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. 


याशिवाय मुंबई गुन्हे शाखेला परमबीर सिंग यांच्या 5 मालमत्तांची माहिती मिळाली असून यात नवी मुंबईतल्या नेरुळ भागात एक फ्लॅटचा समावेश आहे. या फ्लॅटची किंमत जवळपास चार कोटी रुपये इतकी आहे. हा फ्लॅटही भाड्याने देण्यात आला असून त्यातूनही त्यांना लाखो रुपयांचं उत्पन्न मिळतं.


याशिवाय हरियाणातल्या फरीदाबाद इथं दोन मालमत्ता त्यांच्या नावावर असून यात 400 स्क्वेअर फूटाचा एक मोकळ्या प्लॉटचा समावेश आहे. 


चंदीगडमध्ये त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून या मालमत्तेत त्यांच्या दोन भावांचाही वाटा आहे. या शिवाय परमबीर सिंह यांच्याकडे इतरही बेनामी मालमत्ता असल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे. अशा मालमत्तांचाही शोध घेतला जात आहे. 


परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आलं आहे. अशात एका महिन्यात परमबीर सिंग समोर आले नाहीत तर त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली जाऊ शकते.