मुंबई : शिवसेनेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या पारनेरच्या ५ नगरसेवकांनी पुन्हा एकदा हातात शिवबंधन बांधलं आहे. मातोश्रीवर या पाचही नगरसेवकांचा पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आहे. मातोश्रीवर जाण्याआधी हे नगरसेवक अजित पवारांच्या भेटीला आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काहीच दिवसांपूर्वी शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी हा प्रवेश घडवून आणला होता. नंदा देशमाने, वैशाली औटी, नंदकुमार देशमुख, डॉ. सय्यद, किसन गंधाडे या नगरसेवकांचा समावेश होता.


अजित पवारांनी उद्धव ठाकरेंच्या शब्दाचा मान राखला आणि हे नगरसेवक शिवसेनेत परत आले, अशी प्रतिक्रिया मिलिंद नार्वेकर यांनी दिली आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे महाविकासआघाडीमध्ये तणाव निर्माण झाला होता. नगरसेवकांनी राष्ट्रवादीत केलेल्या प्रवेशामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कमालीचे दुखावले. या पाच नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत पाठवा असा निरोप उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना दिला. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी फोनवरून उद्धव ठाकरे यांचा हा निरोप अजित पवारांना दिला होता. 


काय म्हणाले निलेश लंके?


दरम्यान या ५ नगरसेवकांचा शिवसेनेत पुन्हा प्रवेश होत असताना राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे सुद्धा मातोश्रीवर होते. 'हे ५ नगरसेवक भाजपमध्ये जाणार होते, म्हणून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतलं. याबाबत अजित पवारांना भेटलो होतो. उद्धव ठाकरेंनी त्यांची नाराजी ऐकली, त्यांची नाराजी दूर करण्याच आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं आहे,' असं निलेश लंके म्हणाले.


दरम्यान पारनेरमधल्या स्थानिक नेतृत्वाबाबत आमची नाराजी होती. पारनेरमधील नाराजी आम्ही उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केली आहे. पारनेरचा पाणी प्रश्न होता, त्यावरुन आमची नाराजी होती. आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्तावत पाणी प्रश्न सुटणार, असे आश्वासन आम्हाला उद्धव ठाकरेंनी दिलं आहे, असं नगरसेवकांनी दिली.