इंडिगो फ्लाइटमध्ये प्रवाशाला रक्ताच्या उलट्या, हवेतच झाला मृत्यू; हे होतं कारण!
मुंबई-रांची विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशाच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे इंडिगोच्या विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करावे लागले आहे. यानंतर, आजारी प्रवाशाला तातडीने नागपुरातील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Mumbai News : मुंबईहून रांचीला जाणाऱ्या (Mumbai-Ranchi Flight) इंडिगोच्या विमानात (IndiGo) एक खळबळजनक घटना घडल्याचे समोर आलं आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या मुंबई-रांची फ्लाइटमध्ये रात्री उशिरा एका प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर विमानाचे नागपूर येथे इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. मात्र रुग्णालयात नेत असताना प्रवाशाचा मृत्यू झाला. या सगळ्या गोंधळानंतर विमान रांचीकडे रवाना करण्यात आले. विमान कंपन्याची अधिकाऱ्यांनी प्रवाशाच्या मृत्यूची माहिती दिली आहे.
इंडिगोच्या फ्लाइटमधील एका प्रवाशाला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्यामुळे सर्व प्रवासी घाबरले होते. रक्ताच्या उलटीनंतर प्रवाशाची प्रकृती ढासळू लागली आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. प्रवाशाची प्रकृती खालावल्यानंतर वैमानिकाने विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केले आणि त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र विमान उतरेपर्यंत प्रवाशाचा मृत्यू झाला होता.
इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग होण्यापूर्वीच नागपूर विमानतळावर केआयएमएस-किंग्सवे रुग्णालयाचे वैद्यकीय पथक आधीच हजर होते. त्यांनी तातडीने प्रवाशाची तपासणी केली. मात्र विमानातच प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर प्रवाशाला मृत अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार मृत प्रवासी किडनीच्या आजाराने त्रस्त होता. विमानात या प्रवाशाने खूप जास्त प्रमाणात रक्ताची उलटी केली होती. त्यामुळेच काही वेळातच त्याचा मृत्यू झाला होता. पुढील तपासासाठी प्रवाशाचा मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून रांचीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात प्रवासी देवानंद तिवारी यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या होत्या. रूग्णालयाने जारी केलेल्या एका निवेदनामध्ये, प्रवासी क्षयरोग आणि क्रॉनिक किडनी डिसीज या आजाराने त्रस्त होता. त्याला विमानात मोठ्या प्रमाणात रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या.
बोर्डिंग गेटवरच पायलटचा मृत्यू
दरम्यान, गेल्या आठवड्यातच, विमानतळावरच नागपूर-पुणे विमानाची वाट पाहत असताना इंडिगोच्या 40 वर्षीय पायलटचा मृत्यू झाला होता. मृत वैमानिक नागपूरहुन पुण्याला इंडिगो कंपनीचे विमान घेऊन जाण्यासाठी सज्ज होते. मात्र,विमानात बोर्ड होण्यापूर्वीचं ते बोर्डिंग गेट जवळ कोसळले. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे विमानतळावर काही काळ तणावाचे वातावरण होते. कॅप्टन मनोज सुब्रमनियम अस मृत पायलटचे नाव आहे. मृत्यूचे प्राथमिक कारण हृदयविकाराचा झटका असल्याची शक्यता वर्तवली जात होती. सुब्रमनियम यांनी त्याच्या दोन दिवस आधी त्रिवेंद्रम-पुणे-नागपूर या अशा दोन सत्रात उड्डाण केले होते. पहाटे 3 ते 7 दरम्यान त्यांनी हे उड्डाण केले होते. त्यानंतर त्यांनी 27 तास विश्रांती घेतली. यांनतर ते नागपूर पुणे असा प्रवास करणार होते. मात्र डुयुटीवर जात असतानाच ते बोर्डिंग गेटवरच अचानक कोसळले. विमानतळावरील ग्राउंड स्टाफच्या मदतीने सुब्रमनियम यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.