मुंबई : मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात कोविड रूग्णांकडून गोळा केलेल्या 188 स्वॅब नमुन्यांच्या जीनोम सिक्वेंसींगमध्ये, 128 नमुन्यांमध्ये कोरोनाव्हायरसचे डेल्टा प्रकार, 2 नमुन्यांमध्ये अल्फा व्हेरिएंट आणि 24 नमुन्यांमध्ये कप्पा व्हेरिएंट सापडले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज राज्यात आणखी सत्तावीस डेल्टा प्लस रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण डेल्टा प्लस रुग्णांची संख्या 103 एवढी झाली आहे. नागपूरमध्ये 9, अमरावतीत 6, नाशिकमध्ये 2, गडचिरोलीमध्ये 6, यवतमाळमध्ये 3 तर भंडाऱ्यात 1 डेल्टा प्लस वेरिएंटचा रुग्ण आढळला आहे.


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना तीन वेगवेगळ्या प्रकारचे वेरिएंट आढळल्याने मुंबईकरांच्या चिंता वाढणार आहेत. अनेक देशांमध्ये कोरोनाचे डेल्टा वेरिएंट धुमाकूळ घालत असताना आता मुंबईतही प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत.


कोरोना रुग्णांची संख्या आता हळूहळू पुन्हा एकदा वाढू लागली आहे. लोकलमध्ये गर्दी देखील वाढत आहे. कोरोनाचे निर्बंध देखील शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे सप्टेंबरमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात होण्याची शक्यता आहे.


मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढला तर तो नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनापुढे मोठं आव्हान असणार आहे. याआधी मुख्यमंत्र्यांनी ही कोरोनाचे नियम पाळण्याचं आवाहन केलं होतं. पण आता लोकांची बेफिकरी देखील वाढत आहे. गणेशोत्सव आणि दहीहंडी सारखे सण जवळ येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहेत.