मुंबई, गणेश कवडे, झी मीडिया : जर तुम्ही भटक्या कुत्र्यांना जेवण देत असाल तर सावधान...! कारण अशाच प्रकारे कुत्र्याला जेवण देणाऱ्या काही नागरिकांना दंड ठोठावण्यात आला आहे. दिवसाला तब्बल अडीच हजार रुपये दंड लावण्यात आला आहे. मुंबईत कांदिवली पश्चिम येथील निसर्ग हौसिंग सोसायटी मध्ये हा प्रकार घडला आहे.  नेहा दतवाणी आणि केतन शाह या दोन नागरिकांना सोसायटी मधील भटक्या कुत्र्याला जेवण देणे चांगलेच महागात पडले आहे. दिवसाला तब्बल अडीच हजार रुपयांप्रमाणे एकूण साडे तीन लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. सोसायटी मधील निर्णयाविरुद्ध जेवण देत असल्यामुळे हा दंड आहे. मात्र हा दंड कोणत्या नियम, कायदा नुसार आहे? याबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी अद्याप माहिती दिली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणी निबंधकांकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र त्यांनी देखील याविषयी स्पष्ट निर्देश दिले नाहीत. याप्रकरणी आता सामाजिक संस्था आणि वकिलांशी चर्चा करुन पुढचा निर्णय घेणार असल्याचं तक्रारकर्ते सांगतात.


या विषयावर निसर्ग सोसायटी मधील इतर सदस्यांनी बोलण्यासाठी नकार दिला आहे. मात्र अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना आधार देणाऱ्या नागरिकांच्या विरोधात वादाचे प्रसंग घडत आहेत. पालिकेने ठोस नियम तयार करुन अंमलबजावणी करावी, अशीही मागणी होत आहे.